ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा.

भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज खूप आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते. ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले. डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात.

इतक्यात, अचानक विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले. डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता. त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता. पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले.

प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता इतक्यात वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला. रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत.

पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते. सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले. कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.

एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले. तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या. त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली. माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का? डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात प्रार्थना करायला लागली. प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती. डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची प्रार्थना संपली. डाॅ. नी तिला विचारले या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?
देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का? आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली खोल आवाजात ती म्हणाली “माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे. मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.

मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल…”

पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली. डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले काय बोलावे ते कळेनाच त्यांना त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही.

गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला याच घरात आसरा घ्यावा लागला आणि आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती काय अद्भूत् चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले …!

सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी देवावरची अपार निष्ठा. कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना.

या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *