आयुष्य घडी भराचे, त्यास काळाचा बंध, बंध नात्याला मर्यादेचे, मर्यादा तोडी मैत्रीचे बंध, हसतमुख जीवन असेल, संसारात आनंदाचा गोडवा, खुलतो मैत्री च्या वनात..
मानवाच्या जिवनात सख्खे, चुलत, मावस, मानलेली अशी अनेक नाती मनुष्य जन्माला आले म्हणजे आपोआप मिळत असतात. त्यांचे महत्त्व ही वेळोवेळी आपल्या संस्कृतीने सण साजरे करून आपण मानत असतो किंवा नात्याचे महत्त्व वाढावे कळावे म्हणूनच ते साजरे केली जातात असं समजायचं.
नाती हा प्रकार म्हणजे नियतीचा खेळच जणुं, यात रूसवे फुगवे दुःख आणि आनंदाची अनुभूती. म्हणजे एकंदरीत काय, मसाले भाता सोबत बुंदी चा लाडु. हवे तर याला देवाचा प्रसाद समजु.
या सर्व नात्याच्या पल्याड कधीतरी आपण मैत्री नावाचं स्टेशन गाठतो, ह्या स्टेशनावर आपण जीवनात अनेकदा भेट देतो. त्याची मधाळ गोडी आपण चाखतो तरी अशीच मैत्री राखतो जी नि’स्वार्थ भाव ठेवून केली जाते निभावली जाते. या मैत्री च्या गावाची अजुन एक खास ओळख आहे. मैत्री च्या गावात जात धर्म लिं’ग असा कुठला भे’दभाव आड येत नाही आणि विषयाचे तर कुठलेच बं’धन येत नाही.
आपल्याला जसे दोन हात असतात तसेच दोन खांदे असतात. यातला उजवा खांदा संसाराला तर डावा खांदा मैत्री ला समर्पित करायचा असतो. कधी खांद्याची अशी व्याख्या वाचली नसेल आपण परंतु हीच खरी मैत्री ची ओळख.
गरजेला जसा मदतीचा हात असतो, तसा दुःखात आधार द्यायला खांदा गरजेचा असतो. मैत्री साठीचे छान छान मॅसेज वाचायला मिळतात, मैत्रीसाठी छान छान गाणी लिहली गेलीत, काल एक व्हिडीओ बघितला. साठ मित्र मैत्री परिवारात असणे खुप सोपं, परंतु साठ वर्षे मैत्रीचा सांभाळ करणे कठीण.
मित्र कुठे काय करतात. सहजच सुचलं आणि मैत्री च्या स्टेशनावर सैर करायला पोहचली. तुम्ही आठवा पुन्हा एकदा मित्राच्या गावाचा ठाव घ्या, नक्कीच कळेल मित्र कधी कसे आणि केव्हा आपल्या साठी खांदा घेऊन उभे होते ते.
मैत्री चा असा खास दिवस वा उत्सव नसतो. ज्याने मैत्रीचे स्टेशन गाठले त्याला स्वर्गाचे सुख या भूतलावर लाभले.