पुण्यातली गोष्ट , रविवार होता , घरचे सगळे गावाला गेले होते ,
एकटाच होतो घरी, सकाळचे अकरा वाजत आले होते , ब्रेकफास्ट साठी काही करायचंही जीवावर आलं होतं, थंडी खूपच होती , बाहेर छान ऊन दिसत होतं, म्हंटलं जावं बाहेर सहज फिरत फिरत अन बाहेरुनच काहीतरी खाऊन यावं.
तोवर रस्त्यात मला बघून ह्याने गॅलरी तुन हात दाखवला, “या की डॉक्टर, आज फ्री दिसताय, या चहा घ्यायला ” पुण्यात आल्यापासून हा माझा पक्का पेशंट झाला होता , मित्र नाही म्हणता येणार पण घसट बरीच वाढली होती ..!
वेळीअवेळी चहाचं मला काही वावगं नाही म्हणून गेलो होतो त्याच्या घरी दोन जिने चढून, सुरू होत्या आमच्या इकडच्या तिकडल्या गप्पा वाढत्या कोविड, बूस्टर डोझ वर वगैरे, तेवढ्यात वहिनी आल्या अन माझ्या कडे बघून म्हणाल्या…, “तुम्ही विदर्भातले ना..
आज मी तुमच्या विदर्भातल्या सारखं झणझणीत पिठलं बनवलंय भाकरी सोबत, आणू का थोडं..? चालेल न तुम्हाला ..? जरा जास्तीच झणझणीत झालंय, म्हंटलं आधी विचारून पाहावं तुम्ही डॉक्टर लोकं खाता की नाही एवढं तिखट..! “
म्हंटलं हो चालेल न, खाईन, आवडतं मला, त्या लगबगीने आत गेल्या, आता चहाच्या आधी झणझणीत पिठलं भाकरी च्या कल्पनेनेच भूक खवळल्या सारखी वाटू लागली होती मला ..!
थोड्याच वेळात वहिनी आल्या दोन छोटी ताटं घेऊन, गरम भाकरी अन पसरट बाऊल मधे पिठलं, त्यावर नुकतीच कोथिंबीर टाकलेली, बाजूला कांद्याची कोशिंबीर अन लोणचं ..!
जरा जास्तीच झणझणीत झालय’ म्हणाल्या होत्या वहिनी म्हणून पिठल्याचा रंग मी तांबडा लाल expect करत होतो, पण ते लेमन यलो दिसलं, बहुतेक हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले असतील झणझणीत म्हणाल्या म्हणजे म्हणून मी बोटांनी चाचपून पाहिलं, पण एकही लागेना बोटाला ..!
पिठलं अर्थातच छान झालं होतं, तिच्या नवऱ्याला मात्र चांगलंच तिखट लागत होतं, मी वहिनींना हिरवी मिरची मागून घेतली तेव्हा पाणी पीता पीता तिरक्या नजरेने तो माझ्याकडे बघत असलेला मी बघितलं, गरमागरम पिठलं अन भाकरी मस्तच लागली , वहिनींनी आग्रह करून करून वाढलं ..! (प्रॉपर पुण्याच्या होत्या तरी),
पूर्ण जेवणच झालं होतं माझं, तसा पिठलं माझा वीक पॉईंटच , रोज जरी पिठलं खाऊ घातलं कोणी तरी आवडीनी खाईन मी ..!
फक्त वहिनींच्या ‘जरा जास्तीच झणझणीत’ मुळे माझ्या वाढून गेलेल्या अ’पेक्षा थोड्या भं’ग झाल्या होत्या, एवढंच..!😊🤗