नाम गोड असणाऱ्या स्वामींच्या लीला ही तेवढ्याच गोड आहेत…!!

स्वामींचे लहान मुलासारखे हट्ट करणे, लहान मुलांचे खेळ खेळणे, कुठेही लघूशंका, शौच करणे, मनात आले की कधीही सर्व वस्त्रांचा त्याग करून दिंगबर होणे, कधी कधी पलंग गदागदा हालेपर्यंत मोठ्याने हास्य करणे, कधी राग अनावर करणे, भविष्यात घडणाऱ्या घटना चित्र विचित्र खुणा, हातवारे करून सांगणे.

अशा अनेक गोष्टी स्वामींच्या स्वभावातील विशेष गुण होत. ज्याद्वारे अनुमान काढले असता स्वामी परब्रह्म तर दुरच मात्र सत्पुरूष ही भासू नये. अशी विचित्र अवस्था असे. जिज्ञासू भक्तांना यातून योग्य तो बोध लगेच होई. पण हा स्वभाव ही शुध्द फसवणूक होती. जे केवळ अहंकारी व पढत मुर्ख आहेत, त्यांची परिक्षा घेण्यासाठी हे एक पांघरूण होते.

मानवी बुध्दिला अगम्य असणाऱ्या लीला हा परब्रह्म अगदी सहज करतो. याच्या लीलापुढे लीलाधर विष्णूसुध्दा तोकडा पडतो. एवढ्या गोड लीला स्वामींच्या आहेत. ज्यात चीनी दामत्यांचे स्त्री-पुरुष स्वरूप बदलणे, अंबाजोगाईला मुलीचा मुलगा करणे, लघूशंकेने कोरड्या विहरीत पाणी निर्माण करणे, सापाचे, हाडाचे सोने करणे, एकाचे मरण दुसऱ्यावर घालवणे, मुक्याला वाचा देणे, मृत रावणाला जीवंत करणे, विपरीत उपायाने रोग बरे करणे, डोक्यावर हात ठेवून ब्रह्मज्ञान प्राप्त करुन देणे अशा अनेक असाध्य वाटणाऱ्या लीला या लीलाधर स्वामींनी अगदी सहजतेने केल्या आहेत.

ज्या कितीही सांगितल्या तरीही कमीच आहेत. असे स्वामीसुतांना वाटते. जेवढ्या स्वामींच्या लीला गोड आहेत, त्याहून हि स्वामींच्या कळा गोड आहेत. कळा म्हणजे स्वामींचा स्वभाव वा आचरण होय. स्वामींचे आचरण एवढे विचित्र होते की, वरवर पाहणारा स्वामींना ढोंगी किंवा वेडा मनुष्य ठरवून मोकळा होई.

तेव्हा या वरवरच्या स्वरुपाकडे न पाहता आपण स्वामींची अंतरंगातून ओळख पटवून घ्यावी व स्वामींच्या सत्य स्वरूपाला जाणून घेऊन स्वामींच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जावे. स्वामींचा नामजप सोहळा अखंड चालवावा, अशी विनंती स्वामीसुत करताना दिसतात.

आपल्या चित्तात केवळ आणि केवळ फक्त स्वामींचेच ध्यान करावे, दिनरात फक्त स्वामीनांच आळवावे. सदैव केवळ स्वामींचाच धावा करावा. कारण हे स्वामीनामच आपल्याला तारणार आहे. आपल्या सर्व संसारीक आणि पारमार्थिक अडी अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वामीनाम हेच सर्वोत्तम औषध आहे. असे स्वामीसुत आवर्जुन सांगताना दिसतात.

शेवटी स्वामीसुत सांगतात, हे मुंबापुरीजन (स्वामीसुत हे मुंबईत असल्यामुळे त्यांनी मुंबापुरी असा शब्द प्रयोग भौगोलिक दृष्ट्या केला असला तरी मुंबईचेच दुसरे नाव मायानगरी आहे. त्याअर्थांने मायेच्या प्रभावाखाली असणारे लोक म्हणजेच मुंबापुरीजन या अर्थाने हे सर्वांनाच लागू पडते) हो, आपल्या मनातील ईतर सर्व शंका कुशंका बाहेर काढा, आपल्यातील ईतर सर्व द्वंद बाहेर काढा, आपल्यातील षडविकार, वासना, मोह, लालसा यांचा त्याग करा. आपले मन, चित्त हे निर्मळ करून त्या निर्मल चित्तात हे स्वामी निधान ठेवा.

या स्वामी निधानाची स्थापना आपल्या शुध्द आणि निर्मल मनात करा. केवळ असे केल्यानेच तुम्ही या मायेच्या प्रभावापासून मुक्त व्हाल. अन्यथा या मायेच्या प्रभावाने एक दिवस तुमचा घात निश्चित आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. लक्ष 84 योनिचे चक्र फिरून हा दुर्लभ नर देह लाभला आहे. एकदा का हि संधी गेली की, मग पुन्हा लक्ष 84 योनीचे चक्र सुरू होईल. तेव्हा हाताशी आलेली संधी न गमावता, माझ्या स्वामींना शरण जा. माझ्या स्वामींचे ध्यान करा.

माझ्या स्वामींचे चिंतन करा. तरच तुमची या मायेपासून सुटका होईल. कारण माझा स्वामी हा मायाधिपती आहे, सर्वेश्वर आहे. माझ्या स्वामीपुढे मायेचा प्रभाव शुन्य होतो. तेव्हा वेळ न घालवता माझ्या स्वामींना शरण या. अशी साद स्वामीसुत घालताना दिसतात. आपण ही स्वामीसुतांची ही सत्यवाणी ऐकूण, आपले सर्वस्वी कल्याण साधण्यासाठी पुर्ण परब्रह्म मायाधिपती सर्वेश्वर स्वामी महाराजांना शरण जाऊ या, आणि सच्चितानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे गोड नाम गाऊ या.

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ.

सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

अनंतकोटी विश्वविज्ञान निवासी परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट यांचा जयजयकार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *