दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या भजनाची धुंद ज्या ठिकाणी होत असते, तेथे ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. त्यात दिगंबराची धुंद म्हणजे सहाजिकच तन्मय अवस्था प्राप्त होणे. या अशा महामंत्राचा अर्थ माहित असणे गरजेचे आहे आणि हा अर्थ विषद करण्यासाठी प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांनी एका आरतीची रचना केली, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा | आरती हे तव चरणी राहो नेति नेति गुरुवरा ||धृ||
स्वामी महाराज कुरुगुद्दी (कुरवपुर) येथे चातुर्मासात असताना तेथे त्यांनी हा मंत्र लिहिला होता. परंतु पुढे ब्रह्मावर्तात चातुर्मासात असताना तेथे प्लेगची साथ आली व गावातील लोक गाव सोडून जाऊ लागले. तेव्हा स्वामी महाराजांनी या मंत्राचे हवन करण्यास सांगितले व प्लेगची साथ निवळू लागली.
भक्तीची सुरवात होते सगुणापासून. ‘ते ब्रह्म आहे.’ ‘नंतर ती येते निर्गुणापर्यंत. ‘अहं ब्रह्मास्मि’ त्यातून शेवट होतो ‘तत्वमसी’ तो तूच आहेस. सगुण निर्गुण एकच आहे. अशा ब्रह्मस्वरूपाचे वर्णन या मंत्रातून सांगितले आहे. परब्रह्म सगुण आहे आणि निर्गुणही आहे.
दिगंबरा या शब्दाचे दोन अर्थ निघतात. खरे तर दिगंबर म्हणजे वस्त्र नसलेला म्हणजे उपाधी नसलेला. आपल्या आतील शुध्द अहं म्हणजे आत्मा. चैतन्य सर्वसाक्षी आहे. निर्विकार आहे. अनंत आहे. अनादी आहे. जे देह नाही. इंद्रिये नाही किवा बुद्धीही नाही. म्हणजेच आत्मा ब्रह्मच आहे. असे हे पहिल्या दिगंबर या शब्दांनी निर्गुणाचे वर्णन केलेले दिसून येते. म्हणजे या दिगंबर शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे.
दिगंबर या दुसऱ्या शब्दाचा अर्थ दिशांनी वेढलेला असा सर्वव्यापी. आकाश सर्वत्र व्यापून आहे. आकाश अनंत आहे. कोणत्याही काळात त्याचा नाश होत नाही. न जन्म, ना मृत्यू. ते मायातीत आहे. मायेने निर्माण झालेल्या भौतिक पदार्थाच्या पलीकडचे आहे. हे ईश्वरस्वरूप ब्रह्म, सर्वव्यापी अशाप्रकारचे जे स्वरूप परब्रह्म आहे. अहम् आणि ब्रह्म एकचआहे. म्हणजेच ‘मी’ साक्षी व साक्ष म्हणजे बाहेरचे विश्व हे असे वाटणे हा भ्रम जायला हवा. म्हणून दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माच्या स्वरूपाचे अनुसंधान केलेले आहे.
तेच ब्रह्मस्वरूप भक्ताचे संरक्षण करण्याकरिता आहे. रक्षण म्हणजे काय? भक्ताची बुद्धी शुध्द करून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करणे. हे कोण करते? तेच ब्रह्म सगुण अवतार घेउनच भक्ताचा सांभाळ करत असते. त्याकरिता श्रीपादवल्लभ हे तिसरे संबोधन आहे. श्रीपादवल्लभ हे जे सगुण स्वरूप व्यक्त झाले, तेच परमात्म्याचे सगुण साकार रूप. तेच ब्रह्म, तोच विश्वकर्ता श्रीपादवल्लभ या रूपाने अवतीर्ण झाला आहे. भक्ती उत्कट झाली की सद्गुरूंच्या कृपेने तो भक्त ईश्वररूपच होऊन जातो.
इथे श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. श्रीपाद म्हणजे ज्याच्या चरणाजवळ श्री आहे, असा जो लक्ष्मीयुक्त परमात्मा हे श्रीपाद या शब्दाने व्यक्त होते. वल्लभ म्हणजे प्रिय. जो भक्ताची संकटे दूर करून त्याचे संरक्षण करतो, म्हणून तो प्रिय असतो. असा जो दत्त तो श्रीपादवल्लभ या संबोधनाने सुचविला आहे.
शेवटी दिगंबरा असे पुन्हा एक संबोधन येते. यातून प्रार्थनेचा आर्त भाव आणलेला आहे. मी ग्रासलेला मायाधीन झालेला असा आहे म्हणून तुम्ही माझे संरक्षण करा. यातून प्रार्थना केली आहे. ईश्वराचे स्वरूप, ब्रह्मस्वरूप, दत्तस्वरूप आणि गुरुस्वरूप ही सर्वत्र एकच आहे. आपणच ब्रह्मस्वरूप आहात मला आपण प्राप्त व्हा. त्याच प्रमाणे लवकर मला आपले करा.
असा हा एक महामंत्र आहे. सगुण व निर्गुण एकच दत्तस्वरूप आहे. त्यांनी आमचे क्लेश दूर करावे. कामक्रोधादिक विकार, अंत:करणातील वासना दूर करून कृपा करावी. आणि शेवटी मीच ब्रह्म आहे या अनुभूतीपर्यंत न्यावे. अशी प्रार्थना या महामंत्रातून केली आहे. म्हणून या मंत्राचा वाणी ने जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे.